ढोली: मारी लुईज काश्नित्झ
जानेवारी महिना
नुकताच संपत आला होता. नाताळची सुट्टी संपल्यानंतर ती जाड मुलगी माझ्याकडे आली.
त्याच हिवाळ्यात मी लहान मुलांसाठी एक वाचनालय सुरु केले होते. दर आठवड्याच्या
ठरलेल्या दिवशी मुले येऊन त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन जायची आणि पुढच्या
आठवड्यात परत आणून द्यायची. येणारी बरीचशी मुले माझ्या ओळखीची होती, पण काही जण मात्र लांबून यायचे. बरीचशी मुले पुस्तके
देवाणघेवाणी पुरती थांबत असत, तर काही मात्र
पुस्तक हातात पडले की तिथेच वाचायला सुरवात करत. मी कोपर्यात बसून माझे माझे काम करत
राहायचे आणि मुले तिथेच माझ्या अवतीभवती छोट्या टेबल खुर्चीपाशी बसून वाचन सुरु
करत. त्यांचा तो सहवास मला आवडत असे. एखाद्या शुक्रवारी किंवा शनिवारी ती जाड
मुलगी माझ्याकडे आली असणार. नक्की नाही आठवत, पण आठवड्याचा ठरलेला वार तो नक्की नव्हता. मला बाहेर जायचे
होते आणि जाण्याआधी काही खाऊन घ्यावे, म्हणून मी
माझे ताट घेऊन टेबलापाशी बसले होते. ती येण्याच्या काही काळ आधी माझ्याकडे पाहुणे
येऊन गेले होते आणि जाताना बहुदा ते दार उघडे ठेऊन गेले असणार. कारण, ताट टेबल वर ठेऊन मी काही आणायला म्हणून वळले, तर मला ती
समोर उभी असलेली दिसली. वय साधारण बारा तेरा च्या आसपास असेल तिचे. अत्यंत मळकट
असा जुना एक कोट, तितकेच मळलेले मोजे घातलेले, आणि स्केटिंग करायचे बूट काखोटीला मारलेले, अशा अवतारात ती
उभी होती. चेहरा तसा मला ओळखीचा वाटत होता, पण नक्की कुठे पहिले आहे ते काही आठवत नव्हते. पण तिच्या
त्या अशा मांजरपावलांनी आत येऊन अचानक समोर उभे राहण्याने मी दचकले एवढे मात्र
खरं.
मी ओळखते तुला? मी काहीसे आश्चर्य वाटून तिला विचारले. ती काहीच बोलली
नाही. ती तिचे हात काहीश्या गुबगुबीत पोटाशी घट्ट बांधून तिच्या पाणीदार मोठ्या
डोळ्यातून एकटक माझ्याकडे पाहत होती.
तुला पुस्तक
हवे आहे का? मी विचारले.
परत काहीच
उत्तर नाही. पण मला त्याचे काही वाटले नाही. मुले सुरवातीला काहीशी कावरीबावरी
असतात आणि आपणच त्यांना मदत करावी लागते, हे मला आता अनुभवाने लक्षात आले होते. म्हणून मग मीच
कपाटातून काही पुस्तके काढली आणि त्या अनोळखी मुलीसमोर ठेवली आणि मग तिच्या नावाचे
कार्ड बनवायला घेतले.
नाव काय गं
तुझं? मी विचारले.
सगळे मला ढोली
म्हणतात, तिने शांतपणे
उत्तर दिले.
मग मी पण तुला
ह्याच नावाने हाक मारू? मी पुढे
विचारले.
तुम्हाला हवं
तसं, ती म्हणाली. मी तिच्याकडे बघून हसले, पण तिच्या डोळ्यात मात्र दुःखाची हलकीशी छटा तरळून
गेल्याचा मला भास झाला, मात्र त्याकडे
दुर्लक्ष करून मी माझे काम पुढे सुरु ठेवले.
जन्म कधीच तुझा? मी विचारले.
कुंभ राशीतला,
तिने शांतपणे उत्तर दिले.
मला त्या
उत्तराची गंमत वाटली. मग मजा म्हणून कार्डवर तीच माहिती भरली आणि पुस्तकांच्या
कपाटापाशी आले.
तू कोणते
विशिष्ट पुस्तक शोधात आहेस का? मी विचारले.
आणि मग अचानक
माझ्या लक्षात आले, ती अनोळखी
मुलगी पुस्तकांकडे बघत नव्हतीच मुळी. तिचे सगळे लक्ष माझ्या ताटाकडे आणि चहाकडे
होते. बहुतेक तुला भूक लागली असणार, मी काहीसे
गडबडून म्हणले. तिने नुसतीच मान डोलावली, आणि त्यामध्ये मला तीच दुखरी भावना परत दिसून आली. मग तिने
ताटातले पदार्थ गपगप एकामागोमाग एक तोंडात
टाकायला सुरवात केली. तिची ती खाण्याची पद्धत खरेतर अत्यंत विचित्र होती, पण माझे
तेव्हा त्याकडे लक्ष नाही गेले. मग ती भिरभिरत्या नजरेने खोलीभर नजर फिरवत शांत बसून
राहिली. तिच्या त्या पाणीदार भिरभिरत्या नजरेमध्ये असे काही होते, की मला त्याबद्दल आणि तिच्या एकंदर असण्याबद्दलच काहीसा
राग आणि घृणा दाटून यायला लागली. मग माझ्या लक्षात आले, मला त्या जाडीबद्दल सुरवातीपासूनच राग येत होता. तिच्या त्या काहीश्या आळसावलेल्या पापण्या, गोंडस पण गुबगुबीत चेहरा, बोलण्याची पद्धत.... काही
म्हणजे काहीच आवडत नव्हते मला. म्हणूनच, जरी मी तिच्यासाठी बाहेर जायचा निर्णय जरी
बदलला असला, तरी
मी तिला काहीशा कोरडेपणानेच वागवत होते. किंवा कदाचित, बाहेर जाण्याची इच्छा बासनात
गुंडाळून मी टेबलपाशी माझे काम करत बसले, आणि तिथूनच तिला जे वाचायचे आहे ते वाच, म्हणले, हेच चांगले वागणे म्हणता येईल.
एव्हाना मला कळून चुकले होते, की त्या अनोळखी मुलीला काहीच वाचायचे नव्हते.
खरेतर मला काहीतरी लिहिण्याची इच्छा होती, पण माझ्याकडून आता काहीच लिहिले जाईना.
काहीसे विचित्र, कणव
दाटून यावे असे विचार माझ्या मनात येऊ लागले होते. कधी कधी कसे आपल्याला काहीतरी
सांगायचे असते पण सांगता येत नाही, आणि सांगून टाकल्याशिवाय काहीच पूर्ववत होणार
नसते, तसे
काहिसे माझे झाले होते. ही कोंडी सहन करण्याचा मी काहीकाळ प्रयत्न केला, पण मग जेव्हा मात्र अगदीच असह्य
होऊ लागले,
तेव्हा मागे वळून मी तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न केला.. गप्पा कसल्या, अत्यंत
निरर्थक प्रश्नांची मालिकाच होती ती.
तुला भावंडे आहेत का? मी विचारले.
हो, ती म्हणाली.
शाळेत जायला आवडते? मी विचारले.
हो, ती म्हणाली.
मग सगळ्यात जास्त काय आवडते?
म्हणजे, तिने मला विचारले.
कुठला विषय? मी काहीसे गोंधळून म्हणाले.
नाही माहित, ती म्हणाली.
भाषा? मी विचारले.
नाही माहित, ती म्हणली.
हातातल्या
पेन्सिलीशी चाळा करत असताना, माझ्या मनात काही
विचित्र भावना दाटून आल्या, ज्यांचा त्या मुलीच्या
तिथे असण्याशी तसा काही संबंध नव्हता.
मैत्रिणी
आहेत का तुला? काहीसे अडखळत मी तिला विचारले.
हो, आहेत की, ती म्हणाली.
त्यातली
एखादी तुझी अगदी घट्ट मैत्रीण असेल नं, मी विचारले. नाही माहित, ती म्हणाली.
तो गुबगुबीत कोट घालून ती जशी तिथे बसली होती, की ती मला एकदम जाड सुरवंट
असल्यासारखी भासू लागली. सुरवंटासारखीच तर खात होती मगाशी, आणि आता
एखाद्या सुरवंटाप्रमाणे इकडे तिकडे वळवळत होती.
आता मात्र
तुला काहीच मिळणार नाहीये, मी स्वतःशीच विचार केला.
अचानक, कुठलास बदला घेण्याची भावना माझ्या मनात जागी झाली. तरीही
आत जाऊन मी आणखीन ब्रेड घेऊन आले. चेहरा काहीसा मक्ख ठेऊन तिने तो ब्रेड निरखून
पहिला आणि परत अधाशासारखे खायला सुरवात केली.... अगदी सुरवंटासारखे.... सावकाश पण
मध्ये एकदाही न थांबता. काहीश्या चिडीने पण न बोलता मी तिच्याकडे बघत राहिले. आता
हळू हळू त्या मुलीचे वागणे, तिचे असणे मला त्रास देऊ
लागले. काय ते गबाळे ध्यान.... कसले ते जुने, फिके कपडे घातले आहेत. तिच्याकडे
पूर्ण दुर्लक्ष करत मी माझे काम परत सुरु केले. पण आता तिच्या मचमच खाण्याचा मला
त्रास व्ह्यायला लागला. काय हवंय तुला? जा न इथून, निघून जा... त्या मुलीला खोलीतून बाहेर ढकलून देण्याची मला
इच्छा झाली.. एखाद्या बोजड प्राण्याला ढकलून द्यावे तसे.. पण मी तिला तसे ढकलले तर
नाहीच, उलट परत तिच्याशी
बोलायचा प्रयत्न केला... त्याच कोरडेपणाने.
बर्फात
खेळायला जाणार तू?
हो, ढोली उत्तरली.
येते तुला
बर्फावर स्केटिंग करता? तिच्या
स्केटिंगच्या बुटांकडे माझा रोख वळवत मी विचारले. अजूनही तो बुटांचा जोड तिने
खांद्यावर लटकावला होता.
माझ्या
बहिणीला खूप छान जमते, ती म्हणाली.
परत तेच काहीसे दुखावलेले, दुःखी भाव तिच्या चेहऱ्यावर तरळले आणि मी तिकडे परत
एकदा दुर्लक्ष केले.
कशी दिसते गं
तुझी बहीण? तुझ्यासारखीच?
नाही नाही, ढोली म्हणाली. माझी बहिण खूप बारीक आहे, आणि छान काळेभोर, कुरळे केस आहेत तिचे. उन्हाळ्यामध्ये
आम्ही गावी जातो, आणि तिथे
रात्री छान वर सुटतो, तेव्हा ती
वर जाते.. सज्जावर आणि गाणे म्हणते.
आणि तू? मी विचारले.
मी बिछान्यावर
पडून राहते, ती म्हणाली. मला भीती वाटते.
तुझ्या
बहिणीला मात्र अजिबात भीती वाटत नसणार, नाही का? मी विचारले.
नाही, ती म्हणाली, तिला कधीच
कशाची भीती नाही वाटत. ती कोलांटी उडी मारू शकते, आणि खूप उंचावरून उडी मारून ती सुळकन पोहत जाते.
कोणते गाणे
म्हणते तुझी बहिण? आता माझ्यात
कुतूहल जागे झाले होते.
तिच्या मनाला
येईल ते, काहीशी दुःखी होऊन ती
म्हणाली. कविता करते माझी बहिण.
आणि तू? मी विचारले.
मी काहीच करत
नाही, ती म्हणली. आणि मग अचानक उभी रहात म्हणाली, आता मला निघावं लागेल. मी माझा हात पुढे केला, आणि तिने तिची जाडी बोटे माझ्या हातात दिली. नक्की काय
झाले ते मला नाही सांगता येणार, पण तिच्या
स्पर्शात एक ऐकू न येणारी पण तरीही आर्त अशी हाक होती, त्यामुळे तिच्या मागे जाण्याची मला प्रबळ इच्छा झाली. ये
परत एकदा, मी म्हणाले खरे, पण ते काही मनापासून नव्हते. काही न बोलता तिने शांत
नजरेने माझ्याकडे पहिले आणि ती निघून गेली. खरे तर मला आता सुटल्यासारखे वाटायला
पाहिजे होते, पण दार बंद होण्याचा
आवाज झाला न झाला तोच, मी पळत
तिच्या मागे निघाले आणि पळत पळतच कोट अंगावर चढवला. वेगाने पळत मी जिने उतरून खाली
गेले आणि क्षणार्धात मुख्य रस्त्याला लागले. पुढच्या कोपर्यावर वळताना दिसली ती
मला.
हा सुरवंट
बर्फावर खेळताना कसा दिसतो ते मला पाहायला हवं, माझ्या डोक्यात आले. बघू तरी हा गुबगुबीत गोळा बर्फावर कसा
खेळतो? ती माझ्या दृष्टीआड होऊ नये, म्हणून मी माझा वेग वाढवला. दुपार व्हायला थोडा अवकाश
असतानाच आली होती ढोली माझ्या खोलीत, आणि आणि
सूर्य कलायला आला होता. माझ्या लहानपणीची काही वर्षे तशी मी घालवली होती ह्या
शहरात, तरी म्हणावे तितके मला
ते परिचित नव्हते. आणि तिला दृष्टीआड होऊ न देण्याच्या प्रयत्नात मी आता इतके पुढे
आले होते, की आपण नक्की कोणत्या
रस्यावर आहोत, हेच मला कळेनासे झाले.
समोर येणार रस्ते आणि जागा मला पूर्णपणे अनोळखी होत्या. हवेमध्ये मात्र आता
चांगलाच बदल जाणवू लागला. आत्ता आत्तापर्यंत थंड असणारी हवा आता मात्र तापू लागली.
अचानक वाढलेल्या तापमानामुळे छतांवर साचलेला बर्फ वितळून पाणी खाली येऊ लागले.
आकाशातही ढग जमा होऊ लागले. हळू हळू आम्ही
शहराबाहेर मोठे बंगले आणि मोठे अंगण असणार्या वस्तीमध्ये पोचलो. ती वस्तीही लवकरच
पार करून आम्ही एका निर्मनुष्य जागी आलो आणि ढोली माझ्या नजरेआड झाली. आता
माझ्यासमोर एक मोठा उतार होता. आता माझी अपेक्षा होती, की मला एक मोठे बर्फात खेळायचे मैदान दिसणार, दिव्यांचा लखलखाट आणि संगीताने आणि विविध आवाजांनी
भारावलेले वातावरण. पण मला जे दिसले ते काही वेगळेच होते. तिथे एक विस्तीर्ण तलाव
होता. माझ्या माहितीप्रमाणे खरे तर, त्या
तलावाच्या भोवताली आता बांधकाम झाले होते, पण नाही..
तो तिथेच होता, अगदी माझ्या लहानपणी
दिसत होता तसाच, घनदाट जंगलाने वेढलेला
आणि तरीही काहीसा एकल.
हा अनुभव इतका
विलक्षण होता, की ती अनोळखी मुलगी
माझ्या नजरेपलिकडे गेली. पण थोड्यावेळात मला ती परत दिसली. ढोली आता दोन्ही पाय
गुडघ्यात किंचित वाकवून एका पायावर दुसरा पाय ठेऊन, त्यावर स्केटिंग चे बूट चढवायचा प्रयत्न करत होती, आणि त्याचवेळी दुसर्या हाताने किल्ली फिरवत होती. ती
किल्ली बर्याचदा खाली पडली. ह्या प्रयत्नांमध्ये अखेरीस ढोली पूर्ण अडवी होऊन
तोंडावर पडली. बर्फावरून खाली घसरताना एखादा विचित्र बेडूक कसा दिसावा तशी दिसत
होती ती. आता अंधार चांगलाच वाढू लागला होता. पाण्याकडे जाणारा निमुळता पूल
ढोलीच्या काही पावलेच दूर होता. पाण्याच्या चमकणाऱ्या पार्श्वभूमीवर तो पूल मधेच
चमकत होता, तर मधेच अंधारात गायब
होत होता. चल, ये पटकन इकडे, मी ओरडले आणि ती खरच तिकडून निघाली. पण माझ्या सांगण्यावरून
नाही... किनार्याच्या पलीकडे एक दुसरी व्यक्ती उभी होती. तिकडून हात हलवत ती जोरात
म्हणाली, ढोली इकडे ये पटकन. त्या
व्यक्तीने आता तिकडे एक गिरकी घेतली. लांबून मला एक गोरीपान आणि नाजूक आकृती दिसत
होती. हीच ती बहिण असणार, माझ्या
लक्षात आले. नर्तकी, वाऱ्यामध्ये
गाणारी, माझ्या मनातली
प्रतिकृती. नक्कीच हिला बघायची इच्छा मला इथपर्यंत खेचून घेऊन आली असणार. पण अचानक माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. ह्या
दोघी मुली चांगल्याच संकटात सापडल्या होत्या. एक विचित्र आवाज यायला सुरवात झाली
होती. वार्याचा गंभीर आवाज, बर्फ
वितळताना होणारा तलावातून येणारा आवाज.
जणू तो तलाव काही गंभीर तक्रार करत असावा, असा आवाज होता तो. ती तक्रार मला ऐकू येत होती, पण त्या मुलींना ती नक्कीच ऐकू येत नव्हती.
नाही, नव्हतीच जात त्यांना ती तक्रार ऐकू. नाहीतर ती जाडी, बेढब मुलगी अशी आत आत चालत गेली नसती. हे असे विचित्र
धक्के आणि गचके खात अशी नसती चालली ती. आणि ती बहिण, ती सुद्धा असे हातवारे करत, हसत, गिरक्या घेत
अशी कसलेल्या नर्तकीप्रमाणे नाचत, तरंगत आत
नसती गेली.
मला ते सगळे
व्यवस्थित दिसत होते, कारण आता मी
सुद्धा एक एक पूल पुढे टाकत पुलाच्या दिशेने पुढे पुढे जात होते. पुलावरची पायवाट
आता बर्फाने निसरडी झाली होती. तरी ढोलीपेक्षा वेगाने
चालत मी पुढे गेले आणि वळून पाहिल्यावर मला तिचा चेहरा दिसला,
काहीसा मंद आणि आसुसलेले भाव
असणारा. आजूबाजूचा बर्फ वितळून एवाना त्यातून फेसाळणारे पाणी बाहेर येऊ लागले
होते. ढोलीच्या पायाखालचा बर्फ पण वितळायला सुरवात झाली होती. पुलाच्या दुसर्या
टोकाशी, जिथे बहिण उभी होती, तिथेही आता बर्फ वितळायला सुरवात झाली होती.
पण ती घटना खूप
धोकादायक नव्हती. बर्फाचा वरचा थर वितळला तरी अजून एक घट्ट थर खालीच होता. ह्याने
झाले इतकेच, की ढोली आता काही मीटर
खाली जाऊन, थंडगार पाण्यात भुसभुशीत पृष्टभागावर उभी राहिली. पाण्यातून चालत आली
असती तर पुलापर्यंत पोचली असती आणि मग उडी मारून वर येणे सहज शक्य होते. मीही तिला
हात दिलास असताच. पण तरीही मला वाटले, तिला नाही
जमणार. भीतीने थिजून असहाय्य हालचाली करत ती तिथेच उभी होती. ते बघून तर माझी
खात्रीच झाली की हिला हे नाहीच जमणार. आजूबाजूचा बर्फ वितळून आता तिच्या भोवती
पाणी वाढू लागले होते. कुंभ रास, माझ्या डोक्यात
आले, कशी हळू हळू पण्याने भरत
आहे. पण मला त्याबद्दल काहीच वाटले नाही. ना
तिची दया आली, ना तिच्याबद्दल वाईट
वाटले.
पण ढोली ने
अचानक डोके बाहेर काढले. रात्र झाल्यामुळे चंद्र आता बर्यापैकी वर आला होता, आणि त्याच्या प्रकाशात मला लक्ख दिसले, की तिच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलू लागले होते. म्हंटले
तर तेच, पण तरीही वेगळे. त्या
चेहऱ्यामध्ये इच्छाशक्ती आणि उत्कटता इतकी ठासून भरली होती की जणू मरणाच्या दारात
उभे राहून तिने अक्खा जीवनरस कोळून घेतला असावा. मृत्यू जवळ आल्याची मला आता जाणीव
झाली, हाच तो क्षण असे वाटून
मी कठड्यावरून वाकून त्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मला काळ्याशार डोहातून
एक प्रतिबिंब माझ्याकडेच बघत असल्याचे जाणवले. हळू हळू ढोली कठड्यापर्यंत पोचली
होती. हातावर जोर देऊन स्वतःला वर खेचण्याचा ती प्रयत्न करत होती. लाकडातून वर
आलेल्या खिळ्यांना आणि आकड्याला तिने घट्ट धरले होते. तिचे शरीर चांगलेच बोजड
होतें आता बोटातून रक्त देखील येत होते. परत एकदा ती खाली पडली, पण परत उठून उभे राहण्यासाठी. खूप मोठा झगडा होता तो, स्वातंत्र्यासाठी आणि परिवर्तनासाठी सुरु असलेला एक भयानक
संघर्ष. स्वतःभोवती गुंडाळलेल्या कोशातून बाहेर येण्याची धडपड मला दिसत होती. मला
खरेतर त्या मुलीला मदत करायची इच्छा होती, पण मला कळून
चुकले, की तिला माझ्या मदतीची आता गरज नव्हती.
त्या दिवशी
मी माझ्या घरी कशी पोचले, हे मला आठवत
नाही. पण हे मात्र लक्षात आहे की जिन्यावर भेटलेल्या माझ्या शेजारणी ला मी जेव्हा
सांगितले की गवताने आणि घनदाट जंगलाने वेढलेला तो तलाव अजून तिथेच आहे, तर तिने नकार दिला, नाही गं, तो तलाव आता तिथे नाही.
त्यानंतर
टेबलावर अस्ताव्यस्त पडलेल्या कागदांना वरखाली करत असताना मला तिथेच कुठेतरी
हरवलेला एक जुना फोटो सापडला.. माझा, उभ्या
कॉलरचा पांढरा स्वेटर, टपोरे
पाणीदार डोळे आणि....
खूप जाड.
**********************
भाषांतर: डॉ. शिवानी परिमल.
Comments
Post a Comment